।। शिवछत्रपती ।।
आज साडेतीनशे वर्षांनंतरही इतिहासाची पाने पुन्हा पालटून पाहिली तर, अखंड भारतभूमीवर अनेक राजे महाराजे होऊन गेलेले वाचायला आणि ऐकायला मिळतात. त्यापैकी नामोल्लेख करण्यासारखे काही मोजकेच. परंतु छत्रपती म्हणून गौरवलेले एकुलते एकच होते. जे होते एकमेक "शिवछत्रपती." ज्यांचा आदर्श इतक्या वर्षांनंतरही कमी न होता त्यामध्ये आणखीन भरच पडत गेलीय. त्याचीच प्रेरणा म्हणून छत्रपतींची ही रयतपिढी तशीच पुढे मार्गक्रमण करत आलीय. शिवनेरी किल्ल्यावर आई जिजाऊपोटी जन्मलेल्या शिवबाची कहाणीही तुम्हांआम्हांसारखीच. पण त्यांनी पाहिलेलं स्वप्ने मात्र अद्वितीय होती. दैवत मानलेल्या आई तुळजाभवानीच्या समोर मोजक्या सवंगड्यासोबत हाच शिवबा जेव्हा स्वराज्य स्थापनेची शपथ घेतो तेव्हा त्याच्या रक्तात त्या स्वप्नांतील आग पेट घेत होती. आणि तिथूनच सुरू झाला "जय भवानी जय शिवाजी" चा प्रवास, जो त्या धगधगत्या रक्ताला योग्य दिशा देण्याचे काम करत होता. पण, इतक्या लहान वयात इतके मोठे स्वप्न पाहण्याचं नेमके कारण काय असावे, हिंदवी स्वराज्य म्हणजे नेमके काय, काय होते शिवबाच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्याचे स्वरूप, आणि तो स्वराज्यनिर्मितीचा विडा शिवबानेच का उचलला असावा, अशी कित्येक प्रश्न आजही उभे राहतात. ज्याची उत्तरे "राजा शिवछत्रपती" या दोन शब्दांतच आहे.
एकविसाव्या शतकात आपला भारत एक प्रजासत्ताक देश म्हणून गणला जातो. आपल्या लोकशाहीची गाथा पूर्ण जगभर मोठ्या कौतुकाने गौरवली जाते. आपली सध्याची शासनपद्धती सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष अशी आहे. प्रत्येकाला आपले आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आपली लोकशाही देते. शहरातील चौकाचौकात शिवरायांचे अश्वारूढ पुतळे अभिमानाचे प्रतिक म्हणून उभारले जातात. घराघरात भिंतीवर सजवलेल्या प्रतिमा पाहून शिवराय म्हणजे आम्हां लोकांसाठी साक्षात देवच असल्याची भावना होते. येथील चौकाला, दुकानाला, पावभाजीच्या ठेल्यालासुद्धा आम्ही लोक प्रेमाने शिवरायांचे नाव जोडतो. या सर्वांतून शिवरायांचे आपणावर झालेले संस्कार दिसून येतात. शिवजयंती दिवशी शिवराय हे कोणा एका वर्गाचे नसून, तळागाळातील प्रत्येक घटकांचे आहेत असे जाणवते. भलेही या जयंतीची सुरुवात टिळकांमुळे झाली असेल, पण या उत्साहाला कारण मात्र शिवरायच असतात. लहानांपासून म्हाताऱ्या गोताऱ्यापर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर 'जय भवानी जय शिवाजी' चे चैतन्य दिसून येते. स्त्रीपुरुष अशा सर्वांना जणू वेडच लागलेले असते. लहान मुले तर या दिवशी स्वतःला शिवाजीच समजायला लागतात. स्वराज्याचे प्रतिक असलेल्या किल्ल्याचे प्रतिरूप तयार केले जातात. आपल्या मुलांमध्ये शिवाजीचे रूप पाहताना त्या प्रत्येक आईमध्ये कुठेतरी जिजाऊची झलक दिसून येते.
पण या लोकशाहीचा नेमका उदय झाला कुठून? स्मरणात जाऊन पाहिले तर आपसूकच लक्षात येईल, याचा उदय हा इसवी सन १६३० पासूनचा आहे. जे त्याकाळी 'हिंदवी स्वराज्य' म्हणून उगम पावले होते. ज्याची मुहूर्तमेढ स्वतः शिवरायांनीच रोवली होती. पण या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न हे काही एका रात्रीत किंवा वर्ष दोन वर्षांमध्ये कष्ट करून एखादी सरकारी पोस्ट काढण्यासारखं नव्हतेच मुळी., संपूर्ण भारतभूमीवरून मुघल, आदिलशहा, कुतुबशाही, सर्व परकीय हुकूमशाही मुळातून उपटून टाकण्याचे कट म्हणजे 'हिंदवी स्वराज्य' होते. "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा... ." या समर्थ रामदासांनी केलेल्या पंक्तीला साजेसं कार्य शिवरायांनी हाती घेतले होते. त्यासाठी स्वतःचं उभे आयुष्य त्यांनी खर्ची घातलेच पण सोबत या स्वराज्याचा भगवा फडकीवताना अनेक प्राणांची आहुती सुद्धा त्यांना द्यावी लागली. ज्यामध्ये त्यांचे सगेसोयरे, भावासम प्रिय सर्व सवंगडी होते. सर्वसामान्य तळागाळातील मावळ्यांना हाताशी धरून त्यांनी हा अभूतपूर्व असा लढा दिला.
आपल्या देशाचा इतिहास संत महातम्यांचा इतिहास सांगतो. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, गाडगेबाबा, रामदास, आदींनी आपले विचार कायमस्वरूपी या मातीत पेरले होते. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य याच जन्मभूमीची मशागत करण्यात खर्ची घातले. त्याच जन्मभूमीत जन्म घेतलेल्या शिवरायांनी मग या मातीमध्ये स्वराज्याचं हिंदवी पिक उभं केलं. शिवरायांच्या विचारांची पार्श्वभूमी या संतांच्या अभ्यासातूनच अवगत झाली. विशेष म्हणजे विचारांची ही पंढरी आजही तितक्याच श्रद्धेने डोक्यावरून वाहिली जाते. मात्र संतांची ही वैचारीक वारी म्हणावी तितकी सोपी नव्हती. आपल्या मातृभूमीवर परकीय हुकूमशाहींची सत्ता होती. या भूमीने त्यावेळी कधी स्वातंत्र्याचा मोकळा श्वासच घेतला नव्हता. इथे जन्माला येणारा प्रत्येक जीव श्वास घेण्याकरिता सुद्धा गुदमरला जायचा. स्वराज्य म्हणजे काय याचा विचारही त्याकाळी लोकांना पटण्यासारखा नव्हता. कारण, मुघल, फ्रेंच, डच, इंग्रज, निजामशाही, आदिलशाहीसारख्या हुकूमशहाने इथल्या जनतेला आपल्या पायाखाली दाबले होते. त्यांच्यावर आपली दहशत माजवली होती. जो कोणी आवाज वर काढण्याचा प्रयत्नही करेल त्याचे मुंडके छाटण्याची उभी कत्तल त्याकाळी सुरू होती. गावेच्या गावे उध्वस्त होत होती, स्त्रियांना दिवसाढवळया उघडे केले जात होते, त्याचा उघडपणे बाजार मांडला जात असे, साहजिकच लहानग्या शिवबाला हे अमान्य होते. गुलामगिरीतून मुक्त होणे हाच एकमेव जगण्याचा मार्ग असू शकतो. हे त्याने त्या गुलामीत होरपळून गेलेल्या जनतेला पटवून दिले. आणि त्यामुळेच त्याने स्वराज्याची शपथ घेतली. पण कोणाला कल्पनाही नव्हती की, हा अवघ्या सोळा वर्षाचा शिवबा या हुकूमशहांच्या पायाखालची जमीन हिसकावून घेईल. स्वराज्याचे बांधलेले तोरण कधी राजगडावरून रायगडावर पोचले याचा मागोवासुध्दा त्यांना लागला नाही. पुढे याच शिवबाला "राजा" म्हणून स्वीकार करण्यास औरंगजेबाला भाग पडले.
शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्य हळूहळू स्वरूप घेत होते. त्यामध्ये सर्व जातीधर्माचे तळागाळातील लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. लहान मुले, पुरुष, स्त्रिया, म्हातारे सर्वजण राजेंकडे मोठया आशेने पहायचे. शिवाजी नावाचा सूर्य उदयास आलाच नसता तर आपण सर्व हुकूमशहांच्या पायाखालची राख बनलो असतो याची जाणीव त्यांना होती. शिवरायांकडे पाहून त्यांच्या मनातील त्या भीतीचे रूपांतर सळसळत्या रक्तात व्हायचे. त्यांना आपोआप प्रेरणा मिळायची. स्वतःचे राज्य, स्वतःचे उत्पन्न, हक्काचा राजा, ही स्वप्ने पहायला शिवरायांनी त्यांना शिकवले होते. शिवराय त्यांच्याकरीता एक पोशिंदा बनले होते. स्वराज्याची महती, हे भगवे वादळ आता साता समुद्रापार पोचू लागले होते. शिवरायांची कीर्ती सह्याद्री ते हिमालय, कच्छ ते तंजावर सर्वदूर पसरली होती. रयतेचा राजा म्हणून जरी शिवरायांकडे पाहिले जात असले तरी, शिवरायांना याची पूर्ण कल्पना होती की, या स्वराज्याचे खरे शिल्पकार त्यांना प्रत्येक मोहिमेत वेळोवेळी साथ देणारे, राजांवरील शत्रूचे वार आपल्या छातीवर झेलणारे, आपल्या भाकरीचा तुकडा वाटून देणारे, याच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मर्द मराठी मावळेच आहेत. शिवरायांच्या प्रेमापोटी त्यांच्या एका आज्ञेवर जीवाची थोडीशीही तमा न बाळगता स्वराज्याची मोहीम आपल्या खांद्यावर वाहणारे एकाहून अनेक "स्वामींनिष्ठ" मावळे त्यांना पावलोपावली मिळत गेले. त्यांच्यामध्ये शिवरायांच्या आज्ञेची भूकच होती. त्यांची ही स्वामिनिष्ठा नक्कीच आदर्शवत होती. म्हणूनच, बाजी, तानाजी, कोंडाजी, संताजी, धनाजी, कान्होजी, नेताजी, मुरारबाजी, रायबा, प्रतापराव, अशी एकापेक्षा एक नावे महाराजांसोबतच सुवर्णअक्षरांनी कोरली गेली आहेत.
शिवरायांच्या पराक्रमांचे धडे वाचताना "शिवाजी कोण होता..?" हा प्रश्न नक्की पडतो. त्यांच्या कर्तृत्वाची महिमा पोवाडे, सिनेमे, नाटकातून पहायला मिळते. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, चेहऱ्यावर कोटींचा आत्मविश्वास, बोलण्यात भारदस्तपणा, ऐटदार चाल, आकर्षक असा पेहराव, डोक्यावर जरीची टोप, दाढी मिश्यांची दौलडार ठेवण, नजरेत कटाक्ष, कमालीचा हजरजबाबीपणा, शत्रूच्या सावलीचीही चाहूल ठेवणारा, असे राजांचे व्यक्तिमत्त्व साकारताना आपण नेहमी पाहतो. अगदी लहान मुलाला जरी विचारले तरी तो शिवरायांचे असेच वर्णन करेल. जिजाऊंचे लाड, तितकेच संस्कार, मराठयांची संस्कृती, संतांचे विचार, दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली वाढलेले शिवराय पुढे जाऊन रयतेचे राजे बनले.
"निश्चयाचा महामेरू,
बहुत जणांशी आधारू,
अखंड स्थितीचा निर्धारु,
श्रीमान योगी,"
या काहीश्या ओळींमध्ये केलेले शिवरायांचे वर्णन भारावून टाकणारे आहे. शिवाजी महाराजांसारखा नेता पूर्ण विश्वाच्या इतिहासातही शोधून सापडणार नाही, "शिवाजी समजून घ्यायचा तर, शिवाजी होता आलं पाहिजे,'' असं नरहर कुरंदकर यांनी आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहलं आहे. जे की तंतोतंत खरेही आहे.
शिवाजी महाराजांकडे खूप प्रगल्भ विचारसरणी होती. सर्वसमावेशक दूरदृष्टी होती. धर्मनिरपेक्ष राज्यनिती होती. ज्याची पाळेमुळे आज कित्येक वर्षांनीसुद्धा पावलोपावली दिसून येतात. जाणवतात. स्वकीयांसोबतच परकीय जनतेलाही तितकेच आपलंसं करणारा लोककल्याणकारी "जाणता राजा'' असा शिवरायांचा डंका पूर्ण विश्वात पसरत होता.
छत्रपती शिवराय कधीच कोणत्या जात, धर्म, पंथ, प्रांत, किंवा राष्ट्राच्या चौकटीत राहिले नाहीत. त्यांना ते अमान्यच होते. इतरांच्या धार्मिक हक्कांवर त्यांनी कधीच आक्रमण केले नाही. उलट प्रत्येकाच्या मूलभूत हक्कांचे वेळोवेळी रक्षणच केले. जुलूम जबरदस्तीला वेळीच पायबंद घातला. शिवरायांची विचारसरणी खूप खोलवर होती. मूर्तिपूजा करणारे व न करणारे दोघेही शिवरायांचे निस्सीम भक्त असायचे. त्यांनी तर शत्रूच्या धर्मावरही तितकेच प्रेम केले. कुराणाचा सन्मान केला. भाऊ जसा बहीनिशी वागतो, मुलगा जसा आईशी वागतो, तसेच राजे पर स्त्रियांसोबत वावरत असत. सामान्यांच्या नजरेत शिवराय पालनकर्ते होते. आपल्या जनतेवर अपार प्रेम करणारे त्यांचा सन्मान करणारे शिवराय 'अवघे विश्वचि माझे घर... ' असे समजत. त्यामुळेच खऱ्या अर्थाने शिवराय सर्वश्रेष्ठ प्रशासक होते.
शिवरायांना जाणून घेईल तितकं कमीच आहे. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा.. . त्यांचे स्मरण होईल तेवढे कमीच. परंतु, स्वराज्य घडवणीमध्ये कूटनीती, भ्रष्टाचार, दगाफटका, फितुरी, फसवणूक, अपमान, या सर्वांचा सामना शिवरायांनाही करावा लागला. सत्तेच्या लालसेपोटी जेव्हा स्वकीय शत्रूला जाऊन मिळायचे तेव्हा ते खूप दुःखी व्हायचे. पण यांतूनच महाराज खंबीर बनत गेले, नवनवीन तंत्र आत्मसात करीत गेले. फितुराला माफी नाही हे तंत्र त्यांनी त्यातूनच अवलंबले. कुटुंबवाद, जाती धर्मातील तेढ त्यावेळीसुद्धा होताच, ज्याची प्रचिती त्यांना स्वतःच्याच राज्यभिषेकवेळी अनुभवायला मिळाली. परंतु, अशी वेळ त्यानी इतर कोणावरही येऊ दिली नाही. नेताजी पालकर हे याचं उदाहरण म्हणून देता येईल. हिंदू धर्मातून जबरदस्तीने मुस्लिम बनलेले नेताजी जेव्हा मुघल कचाट्यातुन सुटून पुन्हा हिंदू धर्मात येण्यासाठी शिवरायांकडे समर्पित होतात, तेव्हा मोठ्या विश्वासाने तितक्याच जिव्हाळ्याने गळ्याशी घेऊन महाराज त्यांना स्वीकारतात. स्वतःचा पुत्र संभाजी जेव्हा नकळत औरंगजेबाला जाऊन मिळतो, व आपल्याच स्वराज्यावर आक्रमण करिवतो, तेव्हा महाराज भावनेने खचूनही जातात. परंतु निर्धाराने कधीच डगमगत नाहीत. त्याच पुत्रावर प्रतिहल्ला करायलाही मागेपुढे पाहत नाहित. ज्याने उभे आयुष्य स्वराज्याला खर्चिले त्या राजांस जीवनाच्या अखेरच्या क्षणी पुत्रविरह सहन करावा लागतो.
एक सर्वश्रेष्ठ प्रशासक या नात्याने आपल्या स्वराज्याची अगदी सुयोग्य रचना राजांनी केली होती. जेव्हा तोरणा जिंकला होता तेव्हापासूनच स्वराज्याची अर्थव्यवस्था रुप घेत होती. स्वराज्य बजेट मांडताना त्यांनी भ्रष्टाचाराला कुठेच थारा दिला नाही. गडावर सापडलेल्या खजिन्याचा वापर ते दुसरा गड बांधण्यासाठी वापरत. एखादा किल्ला लढवताना शत्रूच्या सैन्याची रसद संपवायची, त्यांना सळो की पळो करून सोडायचं आणि जिंकणारी लढाई 'आम्ही आता माघार घेतोय, आम्हाला इतकी इतकी संपत्ती द्या,' असं म्हणून माघार घ्यायचे. जेणेकरून मिळालेली रसद वापरून आणखी एखादा किल्ला घडवता येईल, सैन्य प्रबळ बनवता येईल, आणि पूर्ण ताकदीने पुन्हा त्या कमकुवत बनलेल्या शत्रूवर हल्ला चढवता येईल अशी राजांची रणनिती असायची. त्यांची ही युद्धनीती खुप वाखान्याजोगी होती, आपल्या स्वराज्याचा विस्तार त्यांनी चोहोबाजूंनी केला होता, त्यामध्ये त्यांनी पूर्ण दक्षिण दिग्विजय सर केला, सह्याद्री काबीज केला, जिंजीवर ताबा मिळविला, अशी विखुरलेल्या सत्तेचे उद्दिष्ट जेणेकरून शत्रूचे आक्रमण भंग व्हावे, एका ठिकाणी केंद्रीत नसावे. महाराजांनी स्वराज्याचे सैन्य उभे करताना घोडदळ, पायदळ उभारलेच, सोबत स्वतःचे आरमार सुद्धा उभे केले, आरमार उभे करण्यामागे राजांची किती दूरदृष्टी असेल याची प्रचिती जेव्हा आपण सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्याना भेट देतो तेव्हाच येते. आत्मनिर्भरतेचे स्वप्न राजांनी त्यावेळी स्वराज्यामध्येच पाहिले होते. युद्धामध्ये कामी पडणारे तोफगोळ्यांसाठी कोना इतरांवर अवलंबून रहायला नको यासाठी त्यांनी भगवतीदुर्ग किल्यावर तोफ गाळण्याचा कारखाना सुरू केला. गरज पडेल तेव्हा रयतेच्या अस्तित्वासाठी महाराजांनी काही तहसुध्दा केले, मिर्झाराजे जयसिंग सोबत झालेला तंजावरचा तह त्यापैकीच एक. तहामध्ये गमावलेले किल्ले त्यांना पोटच्या मुलासारखे असायचे, त्यांना पुन्हा परत मिळवण्यासाठी शिवराय रात्रीचा दिवस करायचे. सैन्यात त्यांनी समाजातील सर्वच थरातील लोकांना आश्रय दिला. सर्वांना योग्य वेतन दिले, सर्वधर्मीय बंधुभाव वाढावा, हिंदू मुस्लिम ऐक्य वाढावे, समाजात एकोपा टिकून रहावा, सर्वांना समान न्याय मिळावा, यांसाठी महाराज सदैव प्रयत्नशील राहिले. राज्य चालवण्याकरिता गरजेची करपद्धतसुध्दा राजेंनी सुरू केलेली, आपल्या प्रदेशाचे सोयीस्कर भाग पाडून वतनदारी नेमून दिली. शेतकरी स्वराज्याचा उद्धारकर्ता असला पाहिजे, अशी त्यांची श्रध्दा होती. शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी करू नका, त्यांचा शेतमाल योग्य बाजारभावाने विकत घ्या, असे ते सांगत. झाडे कधी तोडू नका, तोडण्याची गरज पडली तरी एका ऐवजी दहा झाडे लावा, त्या तोडलेल्या झाडाची त्याच्या मालकाला योग्य किंमत द्या, अशा सुचनाच राजांनी आपल्या जनतेला दिल्या होत्या.
शिवरायांना गुलामगिरी, स्त्रियांवरील अत्याचार यांवर वेळोवेळी पायबंद घातले, "जो कोणी बायां-मुलींच्या अब्रूवर हात टाकेल, त्याचे हात त्याक्षणीच कलम केले जाईल," असे कडक फर्मान राजांनी पूर्ण भारतभर जाहीर केले होते. यामुळेच स्वराज्यातील प्रत्येक स्त्री अभिमानाने आपला पदर डोक्यावर घेत होती.
शिवाजी महाराज सुरुवातीपासूनच गनिमी काव्यासाठी ओळखले जायचे. अफजल जेव्हा पूर्ण सैन्यानिशी प्रतापगडावर चालून आला, तेव्हा महाराजांना गडावरून खाली आणण्यासाठी तो खुप शक्कल लढवतो. मंदिरे उद्धवस्त करतो, बायांची अब्रू लुटतो, गोहत्या करतो, पण इतके होत असूनही महाराज गडावरून खाली येत नसतात, उलट त्याला पत्रातून कळवतात, "आम्ही खुप घाबरलो आहोत, तुम्हीच गडावर या, आम्ही शरण जाऊ," अफजलची दिशाभूल करण्यात यशस्वी झालेल्या राजांनी संधी मिळताच अफजलचा कोतळा बाहेर काढला. हा तोच अफजल होता, ज्याने कपटबुद्धीने शिवरायांचे सख्खे मोठे भाऊ संभाजीराजे यांचा घात केला होता. इतकेच नाही तर वडील शहाजीराजेंना याच अफजलने आदिलशाहीच्या मदतीने नजरकैदेत ठेवले होते. अश्या अफजलखानला राजांनी शेवटचा धडा शिकवला होता.
गनिमी कावाने लढणाऱ्या राजांना गरम डोक्याची रणनिती मान्य नव्हती. कितीही सळसळते रक्त असले तरी शांत, संयमी, शिस्तप्रिय नेतृत्व त्यांना पसंद होते. ज्या औरंगजेबने महाराजांच्या स्वाभिमानाला ठेच पोचवून त्यांना आग्र्याला नजरकैदेत ठेवले होते, त्याच औरंगजेबाच्या नजरेखालून धुर्तपणे महाराज केव्हा निसटून गेले याचे भान खुद्द औरंगजेबालाही नव्हते. पुढे त्याच्या मामाची बोटे कापून राजांनी त्यांना घरचा आहेर दिला. शिवरायांनी आपल्या मावळ्यांना "जिंकू आणि फ़क्त जिंकू" हे लढाईतंत्र दिले होते. ऐन युद्धात जेव्हा दिलेरखान बेभान लढणाऱ्या मुरारबाजीला पाहतो तेव्हा हैराण होतो, पण जेव्हा असमर्थ मुरारबाजी अखेरीस धारातीर्थी पडतो, ही बातमी कळताच शिवराय गहिवरून येतात, आपले सैन्य नाइलाजाने माघारी बोलावतात, पण यांवर युद्धातील सैन्य प्रत्युत्तर देते की, "मुरारबाजी गेले म्हणून काय झालं राजे, आम्ही अजूनही जिवंत आहोत, आम्ही किल्ला जोमाने लढू, तुम्ही बेफिकीर रहा.. .'' अश्यावेळी महाराजांच्या डोळ्यात अश्रू तरंगत. कारण, त्यांनीच त्यांच्या मावळ्यांना शिकवले होते, 'रडायचं नाही लढायचं.. ."
जेव्हा प्रतापराव गुजर यांनी शरण आलेल्या बहलोलखानास जीवदान दिले, तेव्हा महाराज गुजर यांच्यावर नाराज झाले, "शरण आलेल्या शत्रूला माफी देण्याचे काम सरसेनापतीचे नसून राजाचे असते," असे त्यांनी प्रतापराव यांना फर्मावले. आपल्याकडून चूक झालीय, ती सुधारण्यासाठी प्रतापराव अवघ्या सहा मावळ्यांना सोबत घेऊन बहलोलखानास पुन्हा जाऊन भिडतात. शिपाई ते सरसेनापती बनताना प्रतापरावना शिवरायांनी आपल्या डोळ्याने पाहिलं होतं, त्याच प्रतापराव गुजर यांच्याविषयी जेव्हा बातमी त्यांच्या कानी पडते, 'वेडात मराठे वीर दौडले साथ.. ."" तेव्हा महाराज स्वतःच्या भावना आवरू शकत नव्हते. त्यांनी आपला प्राणप्रिय सरसेनापती गमावला होता.
इतक्या वर्षांनंतरही इतिहासातील ही पाने जश्याचतशी आहेत. त्यामध्ये काहीच फरक नाही झाला. पण, काही बोटावर मोजण्याइतके इतिहासतज्ञ ज्यांनी राजेंच्या व्यक्तित्वावर अधूनमधून लांच्छन शिंपडले आहे. त्यांच्यामते शिवाजी हा काही राजा नसून एक दासीपुत्र होता. तो खूप आत्मकेंद्रित होता. त्याला कोणताही दृष्टिकोन नव्हता. तो स्त्रीलंपट होता. दिशाहीन होता. आपल्या मावळ्यांचे हकनाक बळी देणारा होता. मुस्लिमांविषयी द्वेष पसरविणारा, गरिबांना लुटणारा लुटारू राजा, त्यांनी बांधलेले किल्ले हे त्यांचे नसून पुर्वीपासूनच अस्तित्वात आहेत. त्यांनी कोणत्या लढाया वगैरे जिंकल्याच नाहीत. हा सर्व खोटा इतिहास आहे. वगैरे वगैरे असे ते वारंवार ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांची मजल इथंपर्यंत जात असते की, शिवाजी महाराज नावाची कोणी राजा व्यक्ती अस्तित्वातच नव्हती, असेही ते बरळून जातात. अश्या मूठभर लोकांच्या इतिहासाकडे पाहण्याच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळेच सर्वश्रेष्ठ प्रशासक असणारे शिवराय गटागटांमध्ये विभागून गेलेत. त्यांच्या शिवछत्रपती प्रतिमेला आता तडे जाऊ लागलेत. शाहू, फुले, आंबेडकर हे बहुजन, दलितांचे कैवारी तर सावरकर, आगरकर, विवेकानंद हे हिंदू ब्राम्हणांचे पुरस्कर्ते. पण या वाटावाटी मध्ये गांधीजी कुठे गेलेत हे कोणाला ठाऊकच नाही.
सत्य जाणून घेण्याऐवजी एका मिनिटासाठी असेही समजून जाऊ की, शिवाजी महाराज नावाची व्यक्ती अस्तित्वातच नव्हती. पण, याने अशी कोणती मोठी वैचारिक क्रांती किंवा इतिहासाची चक्रे फिरणार आहेत?! शिवरायांनी घालून दिलेले आदर्श विचार, समाजातील प्रत्येक स्तरावरील व्यक्तींच्या अंतःकरणात वसलेले शिवराय त्यांचं काय.?
जर का शिवराय खोटे असते तर त्यांच्याप्रति असलेली मावळ्यांची स्वामीनिष्ठा दिसली असती? तानाजी, कोंडाजी, बाजीराव सारखे वेडे जीव द्यायला तयार झाले, मुरारबाजी, गुजर, रायबा यांनी आपली स्वामीनिष्ठा का बरी सिद्ध केली असेल? कोणीही पुरुष राज्यकर्ते नसताना स्वराज्य सांभाळण्याची हिम्मत, प्रेरणा महाराणी ताराबाई यांच्या अंगी कुठून आली असेल बरे? स्त्रियांवर अन्याय होतोय यांसाठी त्यांनी सतीसारख्या प्रथेला विरोध केला, स्वतः महाराणी ताराबाई यांना त्याचा फायदा झाला. जर का शिवराय स्वतः स्त्रीलंपट, बलात्कारी असते तर ही हिम्मत निर्माणच झाली नसती. खुद्द औरंगजेब महाराजांविषयी बोलून जातो, "एकवेळ शिवाजी महाराज स्त्रियांना पळवून नेईल, पण त्यांच्या अब्रूला स्पर्शही करणार नाही,"
महाराजांनी सुरतेवर हल्ला केला, सुरत लुटली, पण ती मुघलांची संपत्ती होती. गोरगरीब जनतेच्या तोंडचा हिसकवलेला घास त्यांनी परत मिळवून दिला होता. जो जो मोघलांना मदत करेल त्याला लुटण्याचे तंत्र त्यांनी अवलंबले. ज्या राजांनी अफजलचा कोतळा बाहेर काढला, त्याच राजाने त्याची प्रतापगडावर मुस्लिम पद्धतीने दफनविधीही केली. शिवाय अंतिमक्षणी औरंगजेबाचे थडगेसुध्दा मराठी जनतेनेच या भूमित गाडले. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून आजही राजेंचा आदर्श घेतला जातो. स्वराज्याच्या प्रत्येक मोहिमेवर त्यांच्या सोबत सर्वधर्मीय मावळे उत्साहाने असायचे. मदारी मेहतर, सिद्धी इब्राहिम अशी खूप नावे सापडतील. महाराज नसतील पण त्यांनी घडवलेली धर्मक्रांती, विचारक्रांती, समाजक्रांती ही येणाऱ्या सर्व पिढीसाठी मैलाचा दगड असतील. ज्याप्रमाणे आपली एखाद्या देवावर अपार भक्ती असते पण आपण कधीही त्या देवाला पाहिलेलो नसतो, त्याच प्रमाणे आपल्यापैकी कोणीही शिवाजी पाहिला नसेल पण शिवछत्रपतीच्या रूपाने हा देव सर्वांच्या मनात श्रद्धेचा विषय असेल यात शंका नाही.
शाळेत असताना एकदा चौथीमध्ये व पुन्हा सातव्या इयत्तेत आम्हाला शिवरायांना अनुभवायला मिळाले. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना ऐकायला मिळाले. पण, सध्याचा वर्तमान काही वेगळाच आहे. इसवी सन १६७४ मध्ये शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे पहिले राजे "छत्रपती'' म्हणून राज्यभिषेक करवून घेतला, पण आधुनिक भारताला या छत्रपतींचा विसर पडलेला जाणवतो आहे. त्यांना आठवण करून द्यावी लागते की, शिवाजी महाराज हे फ़क्त शिवाजी नसून "छत्रपती शिवाजी महाराज'' आहेत. आजही उत्तरेकडील काही राज्यांमध्ये शिवाजी महाराज म्हटलं की त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव उभे राहतात. कारण, त्या लोकांना कधी पूर्णपणे शिवाजी अनुभवयलाच मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात महाराजांविषयी जाणून घेण्याची कुतूहलता दिसते. ज्या राजाने आपल्या पराक्रमाने संपूर्ण भारतभूमी गाजवली, परकीय जालातून आपल्या भूमीला मुक्त केले, तो राजा स्वतंत्र भारतात फक्त एका राज्यापुरताच मर्यादित रहावा, या गोष्टीची नेहमी खंत वाटते.
महाराजांच्या जयंतीवरून, त्यांच्या नावावरून, पुतळ्यावरून राजकारण शिजवताना आपण थोडेही मागेपुढे पाहत नसतो. आज महाराज नुसतेच व्हाट्सअप्प स्टेट्स पुरते मर्यादित न राहता, घरातील भिंतीवर टांगलेल्या फ्रेममधून त्यांना मुक्त करून, त्यांच्या विचारांचे शिवचरित्र संपूर्ण जगभर भरारी घेण्याकरीता सोडले पाहिजे.
जे का रंजिले गांजले,
त्यांसी म्हणे जो आपुले,
तोचि साधू ओळखावा,
देव तेथेचि जाणावा,
या संतांच्या पंक्तीतील अर्थाला साजेशे राजांचे व्यक्तिमत्त्व, त्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे, गडकिल्ल्याची स्वच्छता त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आपलीच. त्याविषयी पावलोपावली जनजागृती केली पाहिजे. नुसतेच महाराजांचे टी शर्टस घालून, गळ्यात त्यांच्या प्रतिमेचे लॉकेट अडकवून, दाढी मिश्या वाढवून, महाराज अंगी अवतारणारे नाहीत. त्याकरिता संपूर्ण अंतःकरणाने त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. ज्याप्रमाणे जिजाऊने शिवाजी घडीवला, तसाच प्रत्येक आईने शेजारच्या घरात शिवाजी घडण्याची वाट न पाहता स्वतःच्या मुलांवर तसे संस्कार द्यावेत. बानगुडे पाटलांचं भाषण ऐकून आजच्या तरुणाचं रक्त उसळून येतं आणि गॉगल चढवून पोरी पटवण्यात व्यस्त राहतं. आया बहिणींवर अत्याचार होत असताना 'राजे तुम्ही पाहिजे होता.. ' असें न म्हणता, 'रडायचं नाही लढायचं.. .' हा शिवाजीमार्ग आठवला पाहिजे. शिवरायांची शिवशाही फक्त बसपूरतीच मर्यादित न राहता संपूर्ण विश्वात त्याची ख्याती पसरली गेली पाहिजे.
इतिहास वर्षानुवर्षे तसाच राहील, फ़क्त त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी स्वच्छ असला पाहिजे. एकीकडे आपला देश महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहतोय, तर दुसरीकडे अजूनही समाजातील काही वर्गात जातीयवाद, अस्पृश्यता, स्त्रीपुरुष असमानता, पहायला मिळते. शिवाजी महाराजांनी घडवलेला स्वप्नातील "हिंदवी स्वराज्य" आज डगमगताना ढासळताना पाहिलं की, समर्थ रामदासांनी छत्रपती संभाजी राजांना लिहलेल्या पत्रातील त्या ओळी आपोआप ओठांवर येऊन जातात,
शिवरायांचे आठवावेे रुप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।।
शिवरायांचा आठवावा साक्षेप(तोल) ।
भूमंडळी ।।१६।।
_whosunilmali
Comments
Post a Comment