"वळू"

तुम्ही लोकांनी बोलणारा पोपट ऐकला असेल. पण मी बोलनारा "वळू" पाहिला आहे. हो अगदी जवळून. माझा खुप जवळचा मित्र.

पण, तुम्हाला प्रश्न पडला असेल की, याने असा "वळू" पाहिला कुठे आणि कसा. तेही चक्क बोलणारा..!!
साहजिकच....मलाही पडला होता.
माणसांच्या या गर्दीमध्ये माणसानेच बोललेले ऐकायला कोणी नसताना, या वेड्याने कोणत्या वळूचा आवाज ऐकला. असेच वाटत असणार. वाटायला मजेशिर असली तरी मी त्याचा प्रत्यक्ष्यदर्शी अनुभव घेतला आहे. हेही खरचं आहे.
तसा मी मात्र खुपच कमी बोलतो. कारण माझ्याकडे बोलायला खुप काही आहे. पण ते ऐकून घेणारे कोणी भेटलेच नाही.

खुप एकटा पडलो होतो मी. एक माझीच दुनिया बनवली होती मी. त्यामध्ये फ़क्त मी आणि मीच होतो.
पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्याची झुळुक, मावळता सूर्य, नदीचा संथ प्रवाह, पावसाची रिपरिप, आणि आकाशातले चंद्र-तारे यांच्याच सहवासात होतो मी. खुप एकटा.
दिवस मावळत होते. महीने पलटत होते. पण विचारांचे चक्र मात्र भूतकाळ, भविष्यकाळ यापेक्ष्या वर्तमान कसे जाईल यातच व्यस्थ होते. स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न करत होते.

अश्याच एके रात्री मी फुटाळ्यावर गेलो होतो.
"फुटाळा तलाव" होते ते. रात्रीचे दोन वाजले असावेत. कोणाची रखरख नाही. ना माणसांची गर्दी. ना कोणाची बडबड. मीच एकटा. माझ्याशीच बडबड करायचो. मला ते आवडायचे. म्हणून मी रोजच रात्री जायचो. आपली सुख दुःख आपल्यालाच सांगायचो. कधी हसायचो, कधी रडायचो. पण रडताना कधी कधी असेही वाटायचे, की आपलंही कोणीतरी असावं.
जे काही बोलू ते निसंकोचपणे ऐकनारे, आपल्या हसु ला हसु तर रडु ला रडु करणारे, आपल्या दुःखात आधार देणारे, आनंदात मिसळणारे कोणीतरी असावे....इतक्यात,

काहीतरी हालचाल झाल्याचे ऐकू आले. मी मागे वळून पाहिले. तर कचऱ्याचा एक ढिगारा होता तिथे. हालचाल अजुन चालूच होती. मी उठून उभा राहिलो. मोबाइलचा टॉर्च ON करुन मी थोड्या जवळ गेलो. तर ढिगाऱ्यातुन काहीतरी दिसत होते.

कुठेतरच पांढरा, काळेभोर चमकनारे डोळे. फेसाळलेले तोंड रवंथ करत असावे असे. मळलेल्या अंगावर बसलेल्या माश्या उठवायला नकळत हलनारी ती शेपुट.
मी आणखी जवळ जाऊन टॉर्चचा उजेड त्याच्या डोळ्यावर पाडला. तर त्याने झपकन आपली नजर माझ्याकडे वळवली...
"कोण आहे रे..!!"

मी मोबाइल हातातून सोडूनच दिला व इकडे तिकडे चौफेर पाहिले. क्षणभर गोंधळूनच गेलो मी. आवाज कुठून आला..!!
मला परत आवाज ऐकू आला.
"अरे घाबरु नकोस, मीच आहे."
"मी वळू बोलतोय."

पडलेला मोबाइल उचलत, स्वतःला सावरत मी उठून उभा राहिलो खरा. पण थक्क, अवाक् होऊन त्याच्याकडे पाहत होतो. मळलेला, कचऱ्यात अस्थाव्यस्त निपचित पडलेला, दिवसभराच्या कडाक्याने थकलेला तो एक वळूच होता. "बोलका वळू."

आपली बसलेली पोजीशन बदलत, कचरा बाजूला सरवत, हळुवार उठून उभा राहिला तो. त्याच्या हालचालीत कसलीच भिती नव्हती. त्यामुळे मला थोडासा धीर भेटला. पण विचार चालूच होता की, "हा बोलला कसा..!!"

माणसासारखाच, पण एक प्राणी होता तो.
त्याचही आयुष्य माझ्यासारखचं बनले होते. आपल्याच विचारात, भविष्याचा विचार न करता वर्तमान जगणारा. त्याचाही आवाज कुठेतरी गायब झाला होता. त्यालाही खुप बोलायचे होते. पण स्वार्थी मतलबी गर्दीमध्ये त्याचं ऐकून घेणारे कोणी भेटले नव्हते. तो रोज मला पाहत असे. माझे निरिक्षण करीत असे. तेव्हा कुठे जाऊन त्याने आज माझ्यासमोर बोलायचे धाडस केले होते.
कारण, त्याला समजले होते की, बोललेले ऐकण्यासाठी कधी आवाजाची गरज नसतेच. त्यासाठी समोरच्याचे डोळे व मन वाचावे लागते. त्यामुळेच त्याने माझ्यावर विश्वास टाकला होता. आमची चर्चा चालूच होती. तळ्याकाठचा मोर कधी ओरडून गेला काही समजलेच नाही. पहाट झाली होती. मी खुप खुश होतो. कारण आम्ही रोज रात्री भेटत होतो. सकाळ पासूनचा प्रवास आम्ही एकमेकाला सांगायचो.

पहाटे उठायचे, गल्लोगल्ली भटकुन कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तोड़ घालून खायला काही भेटते का पाहायचे. आज एक चौक तर उद्या एक चौक असे करुन पूर्ण नागपुर पालथे घालायचा तो. एक रहिवाशीच बनला होता तो. फरक फ़क्त इतकाच होता. की त्यानेही आपली ओळख कुठेतरी गमावली होती. कधी सिग्नलवर, कधी मंदिराच्या पायऱ्यावर, कधी गटारींच्या नाल्यात तर कधी झोपड़पट्टीच्या उकिरडा. दिवसभर हिंडून तो रात्री फुटाळ्यावर यायचा.

माझही आयुष्य त्याच्या सारखचं होतं.
दहा वर्ष्यापूर्वी घरातून बाहेर पडलो होतो. स्वतःच्या शोधात. गरजेपुरते शिक्षण आणि त्याची परतफेड म्हणून केलेली तीन शिफ्ट मधील नोकरी. सकाळ दुपार संध्याकाळ. जेवतोय कधी, झोपतो कधी आणि उठतो कधी याची जाणिवच नव्हती. मीसुद्धा त्या वळूसारखाच नागपुरच्या गल्लीत हरवुन बसलो होतो. त्याला व मला एकच प्रश्न पडायचा, की आपण जे इतकं करत आहोत ते का आणि कश्यासाठी करत आहोत..??
प्रश्न एकच होता. उत्तरही एकच असेल, मात्र त्यामागची कारणे वेगळी होती. याच उत्तराच्या शोधात आम्ही दिवसभर भटकुन रात्री एकत्र यायचो. खुपच घनिष्ठ बनलो होतो आम्ही.

पण त्या रात्री खुप काळजी वाटत होती.
वळूची चिंता लागली होती. कारण, दोन वाजून गेले तरी अजूनही वळू आलाच नव्हता. चिंता वाढतच होती. तीन वाजले तरी, नेहमी माझ्या अगोदर येऊन, ढिगाऱ्यात निपचित पडणारा वळू आज त्या ठिकाणी परतलाच नव्हता. मी खुप शोधाशोध करत होतो. ओरडून ओरडून हाका मारत होतो. तळ्याचे पूर्ण circle पछाडून काढले तरी वळू सापडत नव्हता. मनाची धाकधुक वाढतच होती.
भिती वाटत होती. की वळू जखमी तरी नसेल, त्याचा जीव धोक्यात तरी नसेल, कोणीतरी कत्तलखान्यात कापायला तरी घेऊन गेला नसेल, असे एक अनेक प्रश्न येत होत होते. पण मला वळू हवाच होता. पाण्याचा चौथरा, धोबीघाट, कदाचित पाण्यात बुडाला असेल म्हणून तळ्यात उतरुनही पाहिलो. त्याच्या नेहमीचा कचऱ्याचा ढिगारा अश्या प्रकारे विसकटुन टाकला होता, की मी माझे मलाच ओळखु शकत नव्हतो. मला कश्याचेच भान नव्हते. माणसांची ये-जा सुरु झाली होती. पहाट झाली होती. तळ्याकाठचा मोर कधीच ओरडून गेला होता.

मी निराश, हताश होऊन परत जाऊ लागलो होतो.
कारण मी माझा "बोलका वळू" गमावलो होतो. माझा आवाज गमावलो होतो. येणारे जाणारे माझ्याकडे अश्या नजरेने पाहत होते, जसे की मीच तो "वळू" असावा.
आवाज नसलेला...
स्वतःच्या शोधात असलेला.... 
"मुका वळू...."


_whosunilmali

Comments

Popular posts from this blog

ओय हमाली.!!

Once upon a time in बुधवार पेठ,

"काळू"