"शिक्षणाच्या आयचा घो..!!"

चौकातल्या कॉर्नर वर एक सहा वर्षांचं पोरगं गळ्यात पाण्याची बॉटल अडकवून स्कूल बसची वाट पाहत बसलेलं होतं. तर दुसरीकडे त्याच वयाचं दुसरं पोरगं बैलगाडीतुन जात जात अगदी निरागस होऊन त्या दुसऱ्या मुलाकडे पाहत आपल्या बापाला म्हणतं,
"बा... म्यां पण साळा सिकणार.!"
अवाक नजरेने बैलगाडी थांबवून बाप मनातल्या मनात पुटपुटतो, 'माझं बी पॉर साळा सिकावं.. मोठं व्हावं.!'

आज विसावे शतक. 
विज्ञानाच्या आधारे पुढे चाललेलं शतक. याच विसाव्या शतकात एका बाजूला श्रीमंताचं पोर गळ्यात बॉटल अडकवून बसची वाट बघतयं, तर दुसऱ्या बाजूला गरीबाचं पोर आपल्याच बापासोबत चहाच्या टपरीवर मोलमजुरी करताना दिसतंय.! ज्या मुलांना जगण्यासाठी मोकळा श्वाससुद्धा घेता येत नाही, दोनवेळच्या भाकरी साठी बापासोबत चाकरी करावी लागते, ना दसरा ना दिवाळी ना ईद.! सगळं विसरून कशाचीही खंत न बाळगता बालपणाचा गाडा कसातरी पुढे ढकलणाऱ्या त्या कोवळ्या जीवावर केव्हा फुलणार हा शिक्षणाचा गंध. त्यांनी कधीच शिकायचं नाही.! की त्यांना अधिकारच नाही शिकण्याचा, प्रगतीचा, पुढे जाण्याचा, समाजाला बद्दलन्याचा.!! 
शिक्षणाचा नारा खरचं पोचला आहे का समाजाच्या कानाकोपऱ्यात.? आणि पोचला असेल तर तो किती अंशी परिपक्व आहे.? यांसारखेच कितीतरी प्रश्न आजच्या शिक्षण प्रणालीला खडबडून जागे करणारे आहेत.


पण शिक्षण म्हणजे काय.?

जिजामातेने आपल्या शिवबाला स्वराज्य रक्षणाकरिता दिलेले धडे, अभिमन्यूने आईच्या गर्भातूनच शत्रूशी लढायचे गिरवलेले धडे, शिष्य एकलव्याने गुरुविना प्राप्त केलेली धनुर्विद्या, तर ज्ञानेश्वरांनी आपल्या मोठ्या भावाला गुरू मानून लिहलेली ज्ञानेश्वरी.
हाच गुरू शिष्यांमधील संबंध पुढे शिक्षणाच्या रूपाने समाजापुढे आणला तो महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी. अगदी शेणाचे घाव सोसून गल्लोगल्ली जाऊन मुलांना अबकड गिरवायला लावणाऱ्या सावित्री एकीकडे तर दुसरीकडे आपल्या संसाराची तमा न बाळगता एका वटवृक्षाप्रमाणे शिक्षणाचा पाया रचला तो कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. पण का रचला असेल त्यांनी हा पाया.? समाजाला अज्ञानरुपी अंधकारातुन मुक्त करण्यासाठीच ना.!!

रिझल्ट लागला की पोराला हुरहूर असते ती पुढील शिक्षणाची. तर बापाला काळजी असते ती पोराच्या शिक्षणाच्या खर्चाची. 90% मार्क्स असलेला मुलगा सायन्सला, तर 50% मार्क्स असलेला पर्यायाने आर्टस् कॉमर्सला जातो. अश्यावेळी मनात इच्छा असूनही आपले डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न त्यांना कधीच पूर्ण करता येत नाही. तर त्याच पालकवर्गाचा असाही समज असतो की, सायन्स म्हणजे शिकून कामधंदा, आणि आर्टस् कॉमर्स म्हणजे शिकून बेधंदा.!!
(गेल्या काही वर्षात ही परिस्थिती थोडीफार बदललेली सुद्धा असेल, पण हा लेख दहा वर्षांपूर्वीचा आहे. So मी तेव्हाचाच मुद्दा लिहतो आहे.!)

ज्या काळी गांधीजी आफ्रिकेला जाऊन वकील बनून आले, आज तेच शिक्षण भारतामध्ये पोचून सुद्धा आपला पालकवर्ग आपल्या मुलाला ZP शाळा सोडून, हातामध्ये 5-10 हजार रुपये घेऊन पर्यायी LKG UKG साठीच्या रांगेत उभा आहे. पण ज्या अनाथ गरीब मुलांना पोटच्या भाकरी करीता चाकरी करावी लागत असेल अश्या मुलांचे काय.?!
शिक्षण स्तरावरील ही तफावत कधी दूर होणार.?


आज देशातील भ्रष्टाचार पाहायला गेला तर पाहणाराच भ्रष्ट होऊन जाईल. पण भ्रष्टाचारी मुळे शिक्षणाच्या मंदिरापर्यंत सुध्दा जाऊन पोचली आहेत.
ज्या शाळेला आपण विद्येचे माहेर, कलेचं मंदिर मानतो, त्याच मंदिराला आता गटबाजी व राजकारणाची कीड लागली आहे. आजचे शिक्षण आणि शिक्षक दोघेही बदलेले आहेत. बघायला गेलं तर शाळेत मुलं असतात हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच, पण रजिस्टरला नोंद असते अगदी 70-80 पोरांची.! मास्तर आठवड्यातील दोन दिवस शाळेत तर बाकीचे दिवस पिकनिकवर असतात. पण महिन्यापोटी पगार मात्र भत्त्यासकट खिश्यात.!
सरकारकडून आलेले अनुदान, कोटयावधिंचा पोषण आहार हा कोणाच्या खिशात जातो.? आजच्या भ्रष्ट राज्यकर्त्यांचे हात त्या कोवळ्या जीवांच्या घश्यापर्यंत सुद्धा जाऊन पोचले आहेत.
या कलेच्या मंदिरामध्ये रावणासारख्या शिक्षकांची तर अख्खी टोळीच भरती झाली आहे.

परवा परवाचीच गोष्ट.
वीरभद्र नावाच्या एका कर्नाटकातील शिक्षकाने होमवर्क केला नाही म्हणून एक बारा वर्ष्याच्या विद्यार्थीनीला वर्गाबाहेरच फेकून दिले.! खोलवर तपासणी मधून दिसून आले की, मुलीच्या बापासोबतचे वैर त्या शिक्षकाने त्या मुलीच्या जिवावर काढले.
ज्या शिक्षकाची आपण गुरु मानून आराधना करतो, त्याची गुरूपौर्णिमा साजरी करतो, तोच शिक्षक एका अमावस्येच्या रात्री आपल्या विद्यार्थीनी सोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे.!

खरंच, काळजाला ठेच लावणाऱ्या अश्या घटना ऐकून कोणते आईवडील विश्वास ठेवतील अश्या शिक्षणव्यवस्थेवर.? 
हुकूम व सत्ता गाजवणे हे शिक्षकाचे ब्रीद नसून, सेवा, संस्कार, आदर हे शिक्षकाचे ब्रीद आहे. हे शिक्षकांनी जाणले पाहिजे. आई आणि शिक्षकांनी दिलेली शिकवण ही मुलांना एकतर अंधारी खाईत नाहीतर प्रकाशाच्या वाटेवर घेऊन जातात. मुलांना त्यांच्या आवडीचे व्यासपीठ बनवून देण्याचे कार्य हे आजच्या शिक्षकांचे आहे. ज्याप्रमाणे कवी कविता करून, चित्रकार चित्र काढून, वक्ता भाषणं करून, अभिनेता अभिनय करून आपली कला सादर करतो, त्याचप्रमाणे आजच्या शिक्षकाने एक सुसंस्कृत विद्यार्थी घडवून आपले कार्य करायला हवे. महाभारतात जसे कृष्णाने अर्जुनाला सदैव मार्गदर्शन केले, तसेच, गुरूने देखील आपल्या शिष्याला भविष्यकालीन संकटात सुद्धा सदैव मार्गदर्शन करावे.
शिक्षकाप्रमाणे विद्यार्थीदेखील आपल्या गुरुची मान खाली होईल असे कृत्य करू नयेत. काही कर्तव्य न करता नुसतेच यशाची बडबड करत बसणे, यापेक्षा मोठे अपयश नसतं.
"शिक्षक नियम शिकवतात तर विद्यार्थी नियम बनवितात." हे वाक्य विद्यार्थ्यांनी सिध्द करायला हवे.

आजची शिक्षणपद्धती पाहता एक गोष्ट सातत्याने खटकते, ती म्हणजे परीक्षा.!!

परीक्षा म्हणजे विद्येच्या मंदिरात मांडलेला जुगार अड्डा. एक नाही दोन नाही, तर किती द्यायच्या परीक्षा.?! किती अपेक्षा कराव्यात त्या इवल्याशा जिवाकडून. ज्या वयात खेळायचं बागडायचं त्याच वयात त्याला एका पोपटाप्रमाणे या परीक्षेच्या पिंजऱ्यात का बंदिस्त करायचं.?!
विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे आकडेवारी मधील मूल्यांकन म्हणजे परीक्षा. अशी साधी सरळ व्याख्या आजचा शिक्षक करून जातो.
थॉमस एडिसन म्हणतात,
"Today is my exam, but i dont care. Bz a single sheet of paper cant decide my future."

कुठेतरी अर्थ आहे यांच्या शब्दांत. कारण तीन तासांचे पेपर देऊन कोणी स्वतःचे भविष्य ठरवत असेल, तर शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध दिलेला यशस्वी लढा, ज्ञानेश्वरांनी अवघ्या वयाच्या चौदाव्या वर्षी लिहलेली संस्कृत ज्ञानेश्वरी, किंवा आजच्या राजकारणातील आपले नेतेमंडळी, ज्यांना आपली स्वतःची सहीसुद्धा करता येत नाही. यांनी कोणती परीक्षा दिली होती.?
ज्या वयात परदेशातील विद्यार्थी मुले नवनवीन शोध लावत असतात, त्याच वयात आपल्या देशातील विद्यार्थी तीन तासांची परीक्षा देत असतो.
या सर्व गोष्टींवर पडदा टाकण्याचे काम सरकारने पहिली ते आठवी परीक्षा रद्द करून केले आहे. पण ही समस्या अगदी उच्च शिक्षणापर्यंत आहे, हे या व्यवस्थेने ओळखायला हवे.
हातामध्ये डिग्री सर्टिफिकेट आहे, पण काम नाही. काम आहे, जागा सुद्धा खाली आहेत, पण त्या भरणारा कोणी नाहीय, अशी अवस्था निर्माण झालीय.
(कदाचित सद्यस्थिती बदललेली असेल.!!)

आपल्या देशाबद्दल परदेशात असे बोलले जाते की,
'इस देश का कूछ नहीं हो सकता, क्योंकी यहा पे बुढे लोग देश चला रहे हैं, और नौजवान फेसबुक.!!'
राजकीय क्षेत्रात राहूनही शिक्षण क्षेत्रात कधीच राजकारण न करणाऱ्या डॉ. राधाकृष्णन यांसारखे आदर्श असलेल्या आपल्या शिक्षण प्रणालीने दर्जेदार शिक्षणासाठी ठोस पावले उचलायला हवीत. भविष्यात जर आमूलाग्र असे बदल हवे असतील, तर येणाऱ्या युथ पिढीला देशप्रगतीचे डोस पोलिओ डोस प्रमाणे द्यायला हवे. अन्यथा,
शिक्षणासाठी कायपण म्हणणारी पोरं, शिक्षणाच्या आयचा घो म्हणाली तरी वावगे ठरायला नको.!!


(खूप वर्षांपूर्वी एका संग्रही लिहून ठेवलेला हा लेख आहे. अचानक सापडले. So त्यामधील काही गोष्टींमध्ये कदाचित तारतम्य नसेल, किंवा त्या अजूनही तश्याच असतील. समजून घ्या. Thnkyou.)


_whosunilmali

Comments

Popular posts from this blog

"काळू"

Once upon a time in बुधवार पेठ,

"वळू"