ओय हमाली.!!

Exactly,

बरोबर ऐकलंय तुम्ही.
पण कुठे ऐकलं असेल.?? रेल्वे स्टेशन. बस स्टँड. विमानतळ मध्ये हमाली असतो की नाही याची मलाही कल्पना नाहीय. पण असेलही कदाचित. तोच हमाली जो आपण लोकांनी लहानपणी पाहिला असेल. बच्चनच्या कूली मध्ये किंवा लक्ष्याच्या हमाल दे धमाल मध्ये.

खाकी पेहरावात रुबाबदार मिश्या आणि त्यावर इस्त्री मारलेली तशीच खाकी टोपी. सोबत खांद्यावर ती लाल बावट्याची निशाणी म्हणून टाकलेला लाल रुमाल. रेल्वे आली रे आली पटकन मळलेली तंबाखू तोंडात टाकायची आणि तडक प्रवाश्यांच्या बॅगा डोक्यावर घ्यायच्या. पुढे हमाली आणि मागे त्या बॅगेचा मालक हे चित्र आपण सर्वांनी पाहिलेलं असेल. किमान गोविंदाच्या कूली नं.1 मध्ये तरी पाहिला असेलच.



पण, त्या रात्री जेव्हा मी आणि माझा मित्र एका बस स्टँडवर गेलो होतो, तेव्हा त्या बस स्टँडवर एका वयस्क माणसाने आम्हाला हाक दिली. "ओय हमाली.!!"""
नाही.... अशी हाक नव्हती मारली त्याने. पण त्याचा त्या हाकेमागचा उद्देश तोच असावा.
"अरे पोरांनो... मला थोडी माझी सायकल बसवरून काढून देता का रे.?!" अतिशय क्षीण आवाजात त्याने आम्हाला विनंती केली.
प्रथम आम्ही दोघेही खूप घाईमध्ये होतो. आम्हाला घाईने एक बस पकडायची होती. पण हलक्या नजरेने जेव्हा आम्ही दोघांनी त्या माणसाकडे पाहिलं, तेव्हा मला तरी तो एखादा भुरटाच वाटला.
"ये पऱ्या.. गप्प चल लय शाना हायस. त्या भुरट्याला काही कामधंदे नाहीयत. तू चल गप्प.""
मी रागानेच माझ्या मित्राला गप्प बस पकडण्याचा सल्ला दिला. पण त्या माणसाच्या विनंतीवरून कुठेतरी आम्हाला असं वाटून राहिलं होतं की, खरंच त्याला आपली गरज आहे.

"अरे मी अपंग आहे रे. जत वरून आलो आहे आत्ताच. ड्राइवर आणि कंडक्टर दोघेही मला न सांगताच निघून गेले आहेत. बाळांनो माझी सायकल वर बस वर टाकली आहे तेवढी काढून दया. तुम्हाला मी पैसे पण देतो." त्याने पुन्हा एकदा आम्हाला विनंती केली होती.

पण रेल्वे स्टेशन, बसस्थानकावरील नेहमीच्या अपंग आणि भीक मागणाऱ्या लोकांना पाहून आपण लोकं जसं दुर्लक्ष करून पुढे निघून जातो ना तसंच आम्ही त्याला दुर्लक्षित करून पुढे निघून आलो होतो.
पण पऱ्याच्या मनातील शंका दूर करायची म्हणून आम्ही पुन्हा मागे वळून त्या माणसाला विचारलं,
"ही सायकल तुमचीच आहे हे कश्यावरून.?!!"
"तुम्ही चोर वगैरे तर नाही ना.?"
"तुम्ही अपंग कश्याने आहात.? हाताने की पायाने.??"
"आणि तुमच्या बसचा कंडक्टर कुठंय.? त्याचं काम होतं ना हे.? त्याच्याकडून उतरून घ्यायची ना सायकल.!"
"नाहीतर एखादा हमाल आहे का बघा ना बसस्टँडवर. असं तुम्हाला कोण उतरून देईल तुमची सायकल. त्यापेक्षा एखादा हमाल बघा." "चल रे पऱ्या..!!""

तावातावाने आम्ही त्याची कसून चौकशी केली आणि आम्ही पुढे निघालो. त्या माणसाने आमच्याकडून मदतीची अपेक्षाच सोडून दिली. तो पुन्हा कोणी दुसरा मदतीला भेटतो का याची वाट बघत होता.
तो ज्या बसमधून उतरला होता ती बसही तिथेच जवळ उभी होती. नकळत आमची नजर त्या बसच्या नेमप्लेट वर गेली. ज्यावर लिहलं होतं. "जत- इचलकरंजी."

पऱ्याला लगेच सुचलं की, हा माणूस सुद्धा जतहुन आला आहे. त्यामुळे त्याच्याकडे या आलेल्या बसचे तिकीट असायला हवं. आपण त्या माणसाकडे त्याचं आलेलं तिकीट आहे का ते चेक करायचं. जर का तिकीट असेल तर आपण खरंच त्याला मदत करायला हवी. असा पऱ्याने विचार केला. मलाही त्याचा हा निर्णय योग्य वाटला. आम्ही लगेच त्या माणसाजवळ गेलो.

आम्ही पुन्हा त्याच्याकडे येतोय हे पाहून त्याने पुन्हा आपली विनंतीसाठीची जी काही वाक्ये होती ती पुन्हा बोलायला सुरुवात केली. पण आम्ही त्याच्याकडे त्याच्या तिकिटाची मागणी केली. त्याने लगेच त्याचे तिकीट दाखवले. सोबत त्याच्या पाकिटातील ब्लेड ही काढून दिले. कारण ज्या दोरीने ती सायकल बांधली होती. ती कापावी म्हणून.

पण खरा प्रश्न हा होता की, एसटी च्या टॉप वर चढणार कोण.?? 😂
आम्ही दोघे एकमेकांची थोबाडच बघत होतो. ज्या उदारमतवादी विचाराने आम्ही त्याच्या मदतीसाठी तयार झालो होतो. त्याच उदारमतवादी मनाने आता कोणाला तरी लक्ष्मीकांत बेर्डेचा "तात्या विंचू" बनून एसटीवर चढावं लागणार होतं. दोघांनाही याआधी असा अनुभव नव्हता. काहीतरी ODd वाटणारं असं ते काम नक्कीच होतं. त्यामध्ये आमचे कपडे सुद्धा घाण होऊ शकत होते. पण शेवटी रिस्क आणि एक मजेशीर टास्क या विचाराने एक नवा अनुभव म्हणून मी एसटीवर चढायला तयार झालो.

ज्याप्रमाणे तात्या विंचू वर चढायचा तसाच मी पण एसटीच्या छतावर चढलो. त्या माणसाने दिलेलं ते ब्लेड काढलं आणि त्या सायकलीच्या दोऱ्या मी कापत होतो. कापता कापता मनात असंही वाटत होतं की, आपल्याला बघून कोणतरी हसत आहे. आपली गंमत करत आहे. आपल्याला "हमाली" च्या नजरेने पाहत आहे. आपले कपडे घामाने घाण होत आहेत. परंतु, त्याचबरोबर चेहऱ्यावर एक हसुही येत होतं, कारण आपण एका असह्य माणसाला मदत करत होतो. आणि त्यातून मिळणारा आनंद हा त्या बघणाऱ्या माणसांच्या हसण्यापेक्ष्या नक्कीच थोडा वेगळा होता. मनाला समाधान देणारा होता. मी पटापट दोर कापले आणि सायकल हळुवारपणे खाली सोडली.शेवटी त्या अपंगाला आपली सायकल मिळाली होती. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला होता. खुश होऊन तो आमच्यासोबत खूप काही बोलू लागला होता. जाता जाता त्याने आम्हाला परतफेड म्हणून पैसे आणि चहा घेण्याचीही विनंती केली. पण आम्हाला already त्या कामातून पाहिजे तेवढे समाधान भेटले होते, त्यामुळे आम्ही त्यांचा निरोप घेतला.

आपण लोकांनी केव्हातरी त्या बसच्या दारावर आतील बाजूने लिहिलेली सूचना वाचली असेल. No smoking म्हणून. त्याच्याच वरच्या बाजूला विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळणारी सूचना असेल. पण त्याच्याच बाजूला कुठेतरी असंही लिहिलेलं असतं की, "बसमधील समानांची चढ उतार करण्यास वाहक मदत करेल."
पण ऐनवेळी त्या माणसाच्या बसचा वाहक गायब होता. आणि इतक्या रात्री त्या बसस्टँड वर कोणता "हमाल" मिळणेही मुश्किल असल्याने आम्हीच "हमाली" बनायचं हा आमचा निर्णय त्यावेळी योग्य होता.

एखाद्या भिकाऱ्याच्या टोकरी मध्ये जेव्हा आपण एक रुपयाचं नाणं टाकतो, किंवा एखाद्या अंधअपंग व्यक्तीला आपण जेव्हा रस्ता पार करून देतो, किंवा एखाद्या वयस्कर आजी आजोबाला जेव्हा आपण आपली बसलेली reserve सीट बहाल करतो, किंवा एखाद्या शाळकरी मुलाला जेव्हा रस्त्यावर नकळत आपण लिफ्ट देतो, किंवा एखाद्या परीक्षेमध्ये जेव्हा आपण आपल्या ढ मित्राला आपली answer sheet चोरून चोरून दाखवतो. तेव्हा जितका आनंद मिळतो ना तितकाच आनंद आम्हाला त्या अपंग माणसाला केलेल्या मदती मधून मिळाला होता.

आजही जेव्हा कोणी आम्हाला विचारेल की, तुम्ही इतरांसाठी कधी काही मदत वगैरे केली आहे का.?? त्यावेळी अभिमानाने सांगावसं वाटतं,
"हो केली आहे. एका अपंग असहाय्य व्यक्तीची मदत केली आहे. एका बसवर चढून त्याची सायकल खाली उतरून दिली आहे. एक "हमाली" म्हणून.""



_whosunilmali

Comments

Popular posts from this blog

Once upon a time in बुधवार पेठ,

"काळू"