सपनों का IdiotBox//0.4

"ATM चोर"



दिवसभर न जेवलेने अथवा वेळेवर न जेवलेने कदाचित मला ऍसिडिटी झाली असावी. कारण, शरीरातील पित्त समुद्रमंथन व्हावे तसे वर खाली होत होते. सोबत मलाही वर खाली करण्यास भाग पाडत होते. चारी बाजूंनी आभाळ एकदम गच्च व्हावे, तसेच एकंदरीत डोक्याची अवस्था बनली होती. काही क्षण वाटायचे की, घालावा डोक्यात हात आणि जो काही extra गच्च करणारे मटेरियल आहे, त्याला बाहेर काढून फेकून दयावं. मग डोकं निवांत होऊन जाईल व शांतपणे झोपता येईल.
नेमकं कोणत्या विशिष्ट कारणांनी माझं डोकं दुखत असेल, अश्या विविध कारणांवर मी शोधविचार करीत होतो. त्या विचारांमध्येच अर्धवट पहायचा राहिलेला 'पिकू' सिनेमा मी पहायला घेतला. पण, जसजसा दीपिका आणि इरफान (irrfan) चा लव्ह angle सिनेमाच्या एन्डकडे जात होता. तसतसा माझ्या शरीरातील पित्ताचे मंथन पिकूमधील बच्चनच्या लुज मोशन सारखे तोंडातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होते. न राहवून मी मोबाईल तसाच बाजूला टाकून दिला व दोन्हीं हातांनी जोरजोराने डोके चेपू दाबू लागलो. मध्येच बॅटरी कमी असा वॉर्निंग सिग्नल मोबाईलने दिला. लागलीच एका हाताने कसाबसा मोबाईल चार्जला लावून दिला आणि जोराने डोके बेडवर आपटून दिले.

शेवटी, काही केल्या डोकं काही थांबनारे नाही हे लक्षात आल्यावर मी ठरविले की, याच डोक्यामध्ये आता विचारांचा इतका मारा करायचा (विचार घुसवायचे जबरीने) की, या डोक्याने पुन्हा न दुखण्याचा विचार केला पाहिजे. म्हणून जमेल ते विचार करू लागलो होतो.
जसं की, लग्न केव्हा करायचे, नोकरीसाठी पोस्ट केव्हा काढायची, त्याआधी स्टडी केव्हा संपवायचा, बॉडी केव्हा बनवायची, प्रपोज केव्हा मारायचा, वगैरे वगैरे. इतके विचार कमी असावेत की काय म्हणून शेवटी हाही विचार करून पाहिला की, डिप्रेशन मध्ये असल्यावर थोडंफार पॉर्न पाहिलं की, डोकं दुखायचे थांबतं म्हणे. त्यामुळेच तेसुध्दा करण्याचा मी निर्णय घेतला.

पण, फायनली इतके सारे विचार करता करता मला झोप केव्हाची लागून गेली समजलेच नाही. कारण, अधूनमधून कानाभोवती घुईईई करणारे मच्छर आता असूनही नसल्यासारखे भासत होते.

बहुधा मी एका स्वप्नात गेलो होतो.
माझ्या स्वप्नांचं वैशिष्ट म्हणजे एकतर ती मला झोपेतून अश्या प्रकारे ओरडून उठायला भाग पाडतात, ज्यामुळे आजूबाजूचे लोकही उठून बसावेत. आणि दुसरे हे की, ती स्वप्ने मला आहे तशी सकाळी सकाळी आठवायला लागतात. त्यामुळेच उठल्या उठल्या मी त्या स्वप्नांचे टायटलही ठरवून टाकतो. जसं की याही स्वप्नाचे केले आहे. "ATM चोर."

काही दिवसांपूर्वीच्या एका स्वप्नाचं सांगायचं झालं तर, मी एक इलेक्ट्रॉनिक सर्किट दुरुस्ती करीत होतो. *(actual मध्ये मला काहीही जमत नाही. उदा, एकेवेळी शेजारच्या काकूंचा सिलिंग फॅन दुरुस्ती करताना मी त्याला अश्याप्रकारे दुरुस्त केलं होतं, ज्यामुळे तो फॅन अजूनही उलट्या दिशेनेच फिरतो आहे.) असो, स्वप्नातील सर्किट दुरुस्ती करता करता माझ्या हाताला इतका मोठा इलेक्ट्रिक शॉक बसतो. ज्याचा झटका स्वप्नातून बाहेर माझ्या खऱ्या बोटांना बसतो. आणि झपकन डोळे उघडून जोराने ओरडत मी माझी बोटं सुरळीत आहेत की नाही हे चेक करत बसतो.


अशीच काहीशी माझी स्वप्नं असतात.
"ATM चोर'' ची सुरुवात माझ्या घरातील परसबागेतून होते. (*परसबाग म्हणजे घराच्या मागे असणारी मोकळी जागा, ज्याठिकाणी झाडे किंवा बाग बनवली जाते.)
मी आणि माझी आई दोघे बागेतील झाडांची मशागत करण्यात गुंग असतो. दिवस बुडायला लागल्याने राहिलेली बाकीची कामे उद्या करूया असं सांगून दोघेही आम्ही परसातुन उठायला लागतो. खुरपे आणि फावडे मी माझ्या हातात घेतलं होतं. पण, परसातुन जसजसे अंगणात यावे तसतशी काही तरुणांची हुल्लडबाजी, गोंगाट आमच्या दोघांच्या कानावर पडत होती. घाईने अंगणात येऊन पाहतो तर,
काही विसीतल्या कॉलेजवयीन पोरांचा ग्रुप घराच्या गेटवरून आमच्याकडे पाहून जोरजोरात वाकड्या आवाजात ओरडत असल्याचे जाणवत होते. मी लांबूनच अंदाज लावायला सुरू केली. बाजूला शेजारी राहत असलेल्या धिरजकडेही मी एक नजर टाकली. कदाचित त्यानेच एखादे लफडे वगैरे केले नसावे ना याची खातरजमा व्हावी यासाठी.
इतक्यात, एक घाणेरडी शिवी माझ्या आईच्या दिशेने जात असेलेली मला ऐकायला दिसली. शिवी आईपर्यंत पोचण्याच्या आतच, शिवीचे कारण काय असावे याच्या खोलात न जाताच हातातले फावडे खांद्यावर टाकून मी गेटच्या दिशेने धाव घेतली. खांद्यावरचे फावडे त्या शिवी देणाऱ्याच्या डोक्यावर आदळायचे असा माझा कोणताही बेत नव्हता. कारण, त्याच्याने तो प्रश्न सुटणारा नाहीये याची किंचित जाणीव मला असावी. म्हणूनच, खांद्यावरचे फावडे डोक्यावर न आदळता गेटवरच जोरजोराने आपटू लागलो. आणि चेहऱ्यावर असा राग दाखवू लागलो जेणेकरून ते सर्व पोरं मला पाहून घाबरतील. गेटच्या बाहेर किती तरुण माझ्या विरोधात उभे आहेत याच्याशी मला काहीही देणेघेणे नव्हते. कारण, त्यांनी काहीही कारण नसतांना माझ्या आईच्या दिशेने शिवीगाळ केली होती. ज्यामुळे माझी व त्यांची गेटवरच जोरदार हातापायी होत होती. अधूनमधून मी त्या शिवी देणाऱ्या चेहऱ्याला शिवी देण्यामागचे कारणही विचारतच होतो. पण, त्याची उत्तर देण्याची तशी कोणतीही मानसिकता नसावी.

शेवटी, आम्हां दोघा बाहुबळींची कसरत पाहून धिरजने मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला. पण, धिरजच्या हालचालीवरून तरी असे जाणवत होते की, ही सगळी टवाळखोर गॅंग त्याच्याच कॉलेजची असावी. आणि ते खरेच निघाले. ते सर्व धिरजचेच मित्र निघाले. त्यामुळे, मी माझ्या प्रश्नांचा मोर्चा आता धिरजकडे वळवला.
''अरे धीरू.. . कोण आहेत रे हे टवाळखोर.?? ?
आणि इथे आपल्या गेटवर का जमलेयत.? ?
आणि त्यानें माझ्या आईकडे पाहून का शिवी दिली.?
आणि . .  . लवकर सांग नाहीतर हे फावडे त्या हारामखोराच्या डोक्यात घालीन बग.. .''
माझ्या हातातले फावडे हिसकावून घेत धिरजने तोंड उघडायला सुरुवात केली.
''अरे दादा, तू त्यांचे पैसे चोरले आहेस असा त्यांचा जाम संशय आहे. त्यामुळेच त्याने इतकी मोठी फोज घेऊन आली आहे. गावातल्या ATM मधून त्याचे पैसें चोरीला गेले आहेत.. .!!""

धिरजने सांगितलले कारण ऐकून माझा अर्धा जीव भांड्यात पडला होता. कारण, परसातून अंगणात येताना जेव्हा हा गोंगाट माझ्या कानावर येत होता. तेव्हाच माझ्या मनात पहिला संशय हा माझ्यावर होता. मला वाटत होते की, हा गोंगाट माझ्यासाठी तरी नसावा?! पण, असंही मी कोणतेच लफडे वगैरे केले नव्हते. मग हा गोंगाट कशासाठी असेल या शंकेनेच मी निम्मा घाबरलो होतो. पण, धिरजचे कारण ऐकून असं कोणतेही लफडं प्रकरण (माझंही आणि धिरजचंही.) नाहीये हे तरी स्पष्ट झालं होते.

मी थोडासा शांत होण्याचा विचार केला. दिवसभर मी आईसोबत परसामध्ये झाडांची मशागत करतो आहे. मग, या मुर्खांना कोणी टीप दिली असावी, मीच पैसे चोरले आहेत अशी.

मला या कारणाच्या खोलवर जायचे होते. त्यामुळे गेटचे फाटक मी उघडून घेतले. आणि त्या शिवराळ तरुणाला जरा जवळ घेतले. धिरजनेही त्या सर्व गॅंगला अंगणात येण्यास सांगितले. आईनेही सर्वांना आपुलकीने प्यायला पाणी विचारले. मग मी त्याला शांत स्वरात विचारले, "आता बोला, काय झाले नेमके.?!!"

"अहो दादा, माझं डोकं सकाळपासून सटाकलं आहे. त्यात तुमचा चेहरा पाहून तर माझी आग मस्तकालाच शिवली होती. गावातल्या ATM मध्ये गेलो होतो सकाळी सकाळी. तर ATM मधून पैसेच बाहेर आले नव्हते. पण, अकाऊंट मधून तरी पैसे कट झाले होते. मला ATM कसा वापरायचा ह्याचं ज्यादा नॉलेज नाही. त्यामुळे मी नीट घराकडे गेलो.. .""

इतक्यात त्याचं बोलणे संपले नव्हते. थुंकीचा आवंढा बाहेर थुंकून त्याने पुढची स्टोरी सांगायला घेतली.
".. .तोवर,
गल्लीतलं पोरगं ओरडत आलं की,
'अरं तुझं पैसं तर त्या ATM मधीच पडून व्हतं. टूईटूईई वाजीत व्हतं. तवर त्यो आवाज ऐकून एक माणूस ATM मधी शिरला, आणि बाहीर पडून निघून गेला की, ,,'
'थोडया वेळानं तिथं सिक्युरिटीवाला आला. त्याच्याकडं आम्ही चौकशी केली तर, त्याने कॅमिेरात बघून सांगितलं की, तुझं पैसं तर त्या माणसानं पळीवलं. ..!'
आणि त्या पोरांनेच आम्हाला टीप दिली की, त्या ATM मधून बाहेर आलेल्या माणसाचा चेहरा तुमच्या सारखाच दिसतो. म्हणून तर आम्ही सगळे तुमच्या दारावर आलोय.. ."""
"ते काय माहिती नाही आता, मला माझे पैसे द्या बस्स, त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही."

All over काय प्रकार घडलाय ते आता मला चांगलंच समजून आले होते. पण, या लोकांना कसं पटवून द्यायचं की, तो ATM चोर मी नाहीच आहे. मला हा गुंता सोडवायचा कसा याची खंत लागली होती.
एक प्रकारे चौकशी करायची म्हणून मी त्यांच्याकडे बँकेच्या पासबुकची मागणी केली. व तुमचे एकूण किती पैसे चोरीला गेलेत याची विचारणा केली. त्यावर त्या चिंताजनक व्यक्तीने खिशातील ATM रिसीट काढून माझ्याकडे दिली. ज्यावर त्याच्या ATM कार्डचे मिनी स्टेटमेंट होते. ज्यामध्ये स्पष्ट दिसत होते की, यांच्या कार्डमधून 18000 रुपये कट झाले आहेत. त्यामानाने ती रक्कम खूपच मोठी होती. त्यामुळेच त्यांचे रागाला येणेही स्वाभाविकच होते हे मला समजून आले. मी त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करीत होतो.
"कसंही करून आपण त्या ATM चोराला शोधुया. पण, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचे पैसे चोरले नाही आहेत. तुमचा कुठेतरी नक्कीच गैरसमज होतो आहे. हवंतर तुम्ही माझ्या घराची झडती घेऊ शकता. काहीच हरकत नाहीये.!!" मी माझी बाजू मांडून रिकामा झालो.

माझे म्हणणे ऐकून त्या सर्व पोरांचा चेहरा एखाद्या बेवारस प्राण्यांसारखा झाला होता. पण, काही पोरांचा माझ्यावर अजूनही पूर्ण विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी घरात जाऊन झाडाझडती सुरूही केली होती. मी आणि धिरज मात्र एकमेकांकडे पाहण्याशिवाय काही करू शकत नव्हतो.
एकदोन खोल्यांची झडती करूनही हाती काहीच सापडत नसल्याचे पाहून त्या पोरांनीही आपापले आसन जमिनीवर टेकवून थोडासा विसावा घेतला. त्यातले काही गेटच्या बाहेर निघूनही जाऊ लागले होते. पण, ज्याचे पैसे चोरीला गेले होते त्याच्या चेहऱ्यावर मात्र घोर निराशा दिसत होती. त्यांना इथेही काही सापडणारे नव्हते.
इतक्यात, गेटवरून एक तरुण व्यक्ती माझ्याच वयाची, चेहरपट्टी सेमटूशेम असलेली गेटवरून थेट खोलीत आली. झटकन खांद्यावरची बॅग उघडी केली आणि असतील तितके सर्व पैसे त्या निराश शिवराळ व्यक्तीच्या हातात ठेवले. अचानक इतके पैसे पाहून त्याचाही चेहरा खुलून आला. पटकन त्याने ते सर्व पैसे मोजून पाहिले.
मी विचारले, "किती आहेत.?!!"
तो म्हणाला, "22 हजार.""
"अरेच्या, हो का.. ?!!" मला मनातला मनातच धक्का बसला. कारण, रिसीट वरील हिशोबानुसार तब्बल चार हजार जास्ती आले होते. पण, त्याची त्याला काहीच खबर नव्हती. तो फक्त खुश दिसत होता. ATM ने त्याच्यावर आणि माझ्यावरही वेळाने का असेना उपकारच केले होते.

ज्याप्रकारे त्या पैसे घेऊन येणाऱ्या व्यक्तीने सविस्तर सांगितले की, त्याने कश्याप्रकारे बँकेत जाऊन त्या टूईटूईई वाजणाऱ्या ATM मधील पैसे कोणाचे असावेत याची चौकशी केली. व गावात सर्वदूर पसरलेल्या गोंगाटाच्या ठिकाणी तो कसा पोचला. ते सर्व ऐकून आमचा सर्वांचा त्याच्यावर विश्वास बसला.
अंततः प्रकरण मिटले होते. गँगची सर्व मंडळी जायला निघाले. तो सेमटूशेम तरुणही निघून गेला. जाता जाता न राहवून त्या सर्वांना मी प्रश्न केला, "तो बॅग घेऊन येणारा तरुण मीच मागवला आहे वगैरे असा तुमचा अजूनही कोणता संशय नाही ना.?!!"
प्रश्न माझ्या तोंडातून बाहेर पडणार इतक्यात, मी तो प्रश्न विचारणेच कॅन्सल करून टाकले.
''नको नको, नाही, उलट अंगलट येईल. बस्स.!""


सर्व शांत झाले. गेट लावून मी पुन्हा घरात आलो. आणि समोर पाहतो तर काय,!! पुण्याहुन माझा वर्गमित्र निशांत सोबत त्याची नुकतेच लग्नाची बायको अवाक नजरेने उभे होते. मला मोकळं झालेलं पाहून त्यांनीही मोकळा श्वास घेतला असावा. सामानाची अस्थाव्यस्था पाहून निशांतने त्याच्याच बॅगेतील बिसलेरी काढली व तोंडावर पायावर थोडे पाणी शिंपडून घेतले. त्याची बायकोही घरातून बाहेर परसातल्या चावीकडे फ्रेश होण्यासाठी निघून गेली.

काहीच समजत नव्हते.
कदाचित, त्यांनी हा सर्व हल्लाबोल प्रकार पाहिला असावा. त्यांनाही प्रश्न पडला असावा की, तो 'ATM चोर' मीच आहे.!! कारण, गेटच्या बाहेर ज्यावेळी त्या गँगची हुल्लडबाजी सुरू होती. त्याचवेळी या नवरा बायकोची सुद्धा एन्ट्री झाली होती. पण, हे कोणाच्याही ध्यानात आले नव्हते. अगदी आईच्याही.!!

असो,
निशांतला खाली बसायला सांगून, मी त्याच्या बायकोचा शोध घ्यायला बाहेर पडलो. कारण, ती अंधारातच बाहेर पडली होती. आणि तिला परसातील चावी कुठे आहे हेसुद्धा माहीत नव्हते. आता मला निशांतच्या बायकोची काळजी लागली होती. मी झटकन परसातील लाईट ऑन केली.



_whosunilmali



उत्तरार्धात : आफ्टर स्वप्न,

[गच्च झालेले डोकं अचानकच एकदम कूल झालं होतं. घुईघुईई करणाऱ्या एका डासाने मला माझ्या स्वप्नातून जागे केले होते. घड्याळात आता पहाटेचे 4.30 झाले होते. टाईम पाहताच मी मोबाईलची चार्जपिन झटकन मोबाईल पासून वेगळी केली. कारण, रात्रभर तो खूपच चार्ज झाला होता. आणि माझा असा समज होता की, एका तासाच्या वर मोबाईल चार्ज केला की, त्याची बॅटरी फुगते.

नेहमीप्रमाणे, मी माझ्या स्वप्नाचा कच्चा मसुदा माझ्या इडियट बॉक्समध्ये लिहून ठेवला. आणि 'पिकू' चे राहिलेले शेवटचे वीस मिनिटं पाहु लागलो. 'झिमी झिमी सी.. .' हे song प्लस सुजित सरकारच्या फ़िल्मचे ते बॅकग्राऊंड म्युझिक ऐकून मन आणि डोके दोन्हीही आणखीन कुल करणारे होते. पिकूने घेतलेली बापाची इंडीपेंडंट जबाबदारी व बापानेसुद्धा पिकुला दिलेला इंडीपेंडंस, सोबत रिअल आयुष्यावर फिलॉसॉफी झाडणारा फेवरेट इरफान irrfan तुम्ही लोकांनीही एकदा तरी जरूर पहायला हवा. शेवटच्या काही मिनिटांत बच्चन साहेबांनी घेतलेली एक्सिट मनाला खटकवणारी असली तरीही,]

Comments

  1. NOTe:

    * धिरज व निशांत ही नावे पूर्णपणे काल्पनिक आहेत.
    * actual मध्ये 'पिकू' मी दुसऱ्यांदा पाहत होतो.
    * डिप्रेशनखाली झोपताना पॉर्न पाहण्याचा माझा निर्णय अजूनही पेंडिंगमध्येच आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Once upon a time in बुधवार पेठ,

"काळू"

The Historical आजोबा_