मूर्ख कोण? मी तू तू मी तू तू मी की, राशीबेन.. .!!

विश्लेषण प्रपंच,


आज मला मुद्दामहुन स्पष्टीकरण द्यावे लागत आहे की, मी किती मूर्खपणा केलाय आणि माझा देश कसा मूर्ख बनून गेला आहे याविषयी. मला जे वाटत आहे तेच तुम्हालाही वाटत असेल, किंवा तुमच्या मनात जे चालू आहे तेच माझ्याही मनात चालू असेल असं गृहीत धरूनच मी पुढे सुरुवात करतो;

होय, मी एक मूर्ख नागरिक आहे. त्यामुळेच माझा देशही तितकाच मूर्ख देश बनतो. कारण, सर्वकाही माहीत असूनही मी मुद्दामहुन काही नियम मोडले तोडले. काहीही गरज नसताना रिस्क घेण्याची हौस म्हणून मी रस्त्यावर गल्लीमध्ये हिंडत राहीलो. फुकटच्या राशनसाठी मी सर्व नियम धाब्यावर मारले. 500 रुपयांसाठी मी बँकेत पहिल्याच दिवशी गर्दी केली. काल परवाच काही मित्रांसोबत एक पावसाळी ट्रिपसुध्दा मारून आलोय. मास्क म्हणजे माझ्यासाठी एक फॅशन बनून गेलीय.

"कोरोना" किंवा नोवेल कोरोना किंवा कोविड19 असंही म्हणतात याला. हा एक रोग आहे. पूर्ण जगात याची महामारी घोषित झालीये. या इवल्याश्या न दिसणाऱ्या रोगाने आपली किती मोठी दहशत निर्माण केलीय याची जाहीर पूर्वकल्पना असूनही मी त्याला एकदम हलक्यात घेतलंय! ज्यामुळे तब्बल चाळीस लाखांचा मैल पार करून आपण जगात दोन नंबरचा झेंडा पटकावला आहे. जी नक्कीच अभिमानाची बाब नाहीये.



असो, आपला देश दोन नंबरवर गेला काय आणि एक नंबरवर गेला काय, आपल्याला  काय फरक पडणार आहे. हे सारं असंच चालू राहणार आहे, अगोदरच्या काळात काय रोग आले नाहीत काय!, आमच्या वेळी तर आम्ही प्लेग, पटकीसारखे रोग पाहिलेत, त्याच्यापुढे हा कोरोना कुठली चीज,! एवढं काय घाबरायचं त्या कोरोनाला, आणि आज जे काय चालू हाय त्यात माझी काय चुकी हाय, मी काय केलंय, सगळी चुकी तर त्या सरकारने केलीय. त्यांचं काम हाय ते.. .
या व अश्याच मानसिकतेमुळे कोरोनासारखी दुरून साधीसिम्पल वाटणारी महामारी आपल्या दारापर्यंत येऊन पोचलीय. पण, जेव्हा आपल्या घरातील एखादया प्रिय व्यक्तीला या महामारीमुळे जीव गमवावा लागतो. तेव्हा मात्र आपल्या डोक्यावर आभाळ कोसळल्याची जाणीव होते. मग आपण आपल्याच मूर्खपणावर शर्मिण्दा होतो. पण, त्याचा आता काय उपयोग ना??!

आता काही लोकांना असाही प्रश्न पडला असेल की, अमेरिका, रशिया, स्पेन सारख्या देशांनाही ही महामारी नियंत्रणात ठेवता आली नाही, मग भारताला तरी दोष देण्यात काय अर्थ आहे!
पण, याअगोदर हेही ध्यानात घ्यायला हवे की, जेव्हा याच देशांमध्ये कोरोनाने हाहाकार मांडायला सुरुवात केली होती, तेव्हा आपण लोकच त्याचे हसे बनवत होतो, त्यांनाच सर्व दोष देत होतो. आणि आता मात्र आपणही त्यांच्याच रांगेत जाऊन बसणे, हे कितपत योग्य आहे.!!
सुरुवातीला वाटलं होतं की, चायनाची लोकसंख्या तर आपल्यापेक्षा मोठी. त्यामुळे चायनाची अवस्था एकदम भयानक होईल. तसेच, इटली, स्पेन, ब्रिटन देशोधडीला लागतील. आपला भारत खूप नशीबवान आहे. आपण खूप सुरक्षित आहोत. आपल्या इथे एकदम कमी रुग्ण आहेत. आणि असंही चायनाचा रोग आपल्या गावात कुठे पोचतोय, टेन्शन घ्यायचं काहीच काम नाही!!
आता आपला भारत खूपच प्रगती करेल, जागतिक महासत्ता बनेल, चायनाला अमेरिकेला मागे टाकण्याची भारताला आयतीच संधी मिळाली आहे वगैरे वगैरे. परंतु, दिवसांगणिक चित्र स्पष्ट होत गेले आणि अनपेक्षितपणे आपण मूर्ख बनत गेलो.



मूर्ख यांसाठी म्हणतोय, कारण; मला आकड्यांचा खेळ समजत नाही. मी गणितात खूपच कच्चा आहे. तसाही मी शिक्षण घेऊनसुध्दा अडाणीच आहे. म्हणूनच, worldometer असो, सरकार असो, आरोग्यसेतू असो, या सर्वांनी जाहीर केलेली यादी मला नेहमी मूर्खांचीच यादी वाटली आहे. जी मूर्खांसाठी बनवली गेली आहे, म्हणजे माझ्यासाठी.. .!!
कदाचित या यादिंमधील आकडे खरेही असतील किंवा दिशाभूल करणारेही असतील. कारण, प्रत्येक देश इथे प्रत्येकाच्या सोयींनुसार शेण खातो आहे.
पण काहीही असो, शेवटी आपण सर्वांनी कोरोनाला फाट्यावर मारलं आहे. सुरुवातीपासूनच टॉपला असणे आणि तळापासून हळूहळू टॉपला येणे यामधला फरक समजून घ्यायला हवा. यालाच प्रगती करणे असं म्हणतात. पण ही प्रगती आपल्या आरोग्य विभागाची आहे असं म्हणावं लागेल. जी इतकी वर्षे प्रगतीशून्य होती. भारतीय आरोग्य विभागाने चाळीस लाखांवर कोरोना रुग्ण शोधून आपणही आरोग्य सेवेच्या बाबतीत कमकुवत नसल्याचा जो दाखला दिला आहे, तो खरंच खूप कौतुकास्पद आहे. त्याबद्दल त्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना मनापासून सलाम.

तरीही, वस्तुस्थिती खूपच वेगळी आहे. गेले पाच सहा महिने आपले सरकार जी आकड्यांची गोळाबेरीज दाखवत आहे, ती सामान्य नागरिकांना समजण्या पलीकडे आहे. ग्राऊंड लेव्हलवरील लोकांना डेथ रेट, रिकव्हरी रेट, डबलिंग रेट, किंवा रुग्ण वाढीचा दर "0" टक्के, रुग्ण बरे होण्याचा दर "0" टक्के, रुग्ण दुप्पट होण्याचा दर "0" टक्के, मृत्यचा दर अमुक तमुक टक्के वगैरे यांपैकी त्यांना काहीच समजत नसते.  त्यांना फक्त इतकेच सांगायला हवे की, आज ढीगभर कोरोना सापडला आहे, खूप सारे मरण्याच्या वाटेवर आहेत, तरी तुम्ही लोकांनी घराबाहेर विनाकारण पडूच नका, लॉकडाऊन वगैरे चालतच राहील, तुम्ही यांकडे लक्ष देऊ नका. काळजी घ्या. बस्स.



पण, ही सरकारी आकडेवारीच सध्याचे चित्र आहे. ज्यामध्ये आपण नुकतेच ब्राझीलला दोन तीन लाखांनी मागेही टाकले आहे. आणि आपले पुढील लक्ष आता अमेरिका आहे. ज्यावरून आपण आणखी कितपत मुर्खांत निघणार आहोत ते समजेल. पण, ईश्वर करो, आणि तशी वेळ आपल्यावर न येवो.

देशपातळीवर, राज्यपातळीवर, जिल्हापातळीवर, तालुकापातळीवर, गावपातळीवर, सर्वच पातळ्यांवर आपण कोरोनापुढे हरलोय. मी कोविडच्या संपर्कात आलोय हे माहीत असूनही घरी जाऊन माझ्याच मुलांशी खेळतो आहे, त्यांच्या सोबत जेवतो आहे. याला मूर्खपणा म्हणायचं नाही तर काय म्हणायचे?! लोक खरंच नियम पाळताना दिसतायेत का, उपाययोजना योग्य स्तरांवर मिळत आहेत का, असे सर्वच प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आलीय. पण इथे उलटच घडताना दिसतंय. प्रत्येकी दीड लाखांसाठी म्हणून मुद्दामच कोरोनारुग्ण वाढवले जात आहेत अशी बातमी अफवा पसरवली गेली. ज्यावर व्हाट्सअप्प मिम्स सुद्धा बनवले गेले. ज्यामुळे, भयभीत होऊन कोणी चेकिंग करण्यासही बाहेर पडत नाहीयेत. यावरून आपण मुर्खपणाचा किती मोठा शिखर पार केलाय हेच सिध्द होतं.

एखादा देश हा त्या देशातील नागरिक, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना एकत्र घेऊन बनत असतो. त्यामुळेच, जागतिक क्रमवारीत आपल्या देशाला टॉपचे मूर्ख बनवण्यात या सरकारी यंत्रणेचा, प्रतिनिधींचाही तितकाच हात आहे, जितका नागरिकांचा. गोंधळ घालणारे सरकार, त्यांचे बुचकळ्यात टाकणारे निर्णय, आणि त्यांची ढिसाळ अंमलबजावणी करणारे प्रशासन. वेळोवेळी दोन्ही हात वर करून बाजूला होणारे, कोरोनाच्या चलपटावरही सत्तेचा सारीपाट खेळणारे लोकप्रतिनिधी. हे सगळेच सोयीनुसार मूर्ख बनत गेलेत.

कोरोनाची वेळ जरी सर्वांसाठी नवीन असली तरी, महामारीचा काळ मात्र आपल्यासाठी नवीन नाहीये. म्हणूनच, त्यांनी घेतलेले निर्णय योग्य की अयोग्य हे ठरवण्याची सध्याची वेळ नाहीये. म्हणूनच न राहवून सरकारने लोकांसाठी काय केले हा प्रश्न पडतोच.
सरकारने जमावबंदी केली, संचारबंदी केली, कुलुपबंदी केली, उठावबंदी केली. भयभीत जनतेने त्याचं शक्य तितकं पालनही केले. त्यापश्चात सरकारने लोकांना काय दिले.?!!
ना कुठे फोकटमध्ये मास्क वाटप केले, ना सॅनिटायझर वाटले. गरीब मध्यमवर्गीय, छोटा मोठा जोडधंदा करणाऱ्या लोकांना ना प्रोत्साहनपर अनुदान दिले. ना मजुरांना स्थलांतरीत कामगारांना योग्य वेळेत घरपोच केले. ना घरोघरी जाऊन प्रामाणिकपणे कोरोना सर्व्हे केला. ना ही लोकांना त्यांच्या जिवनावश्यक्य गोष्टींचा घरोघरी जाऊन पुरवठा केला. यांपैकी काहीच घडले नाही. उलट सरकारने अधूनमधून टीव्हीवर येऊन मुलाखती देण्याचे ढोंग केले आणि अयोग्य वेळी कारखाने, उद्योगधंदे, बाजारपेठा उघड्या करून हुर्रे!! उडवत लोकांना घराबाहेर पडण्यास चालनाच दिली. ज्याची कोणतीही पूर्वतयारी नाही, पुर्वनियोजन नाही, पूर्वकल्पना नाही, पुर्वव्यवस्था नाही. सुव्यवस्था नाही.!!
अगदी असंही म्हणता येणार नाही की, सरकार पुर्णपणे झोपेत होते काय!! तर सुरुवातीपासून सरकारने काहीश्या प्रमाणात हालचाली चालू ठेवल्या आहेतच. लोकांना फुकटचे धान्य, पैसे, सिलेंडर वाटप करून त्याचा गाजावाजा केलाही. पण, नंतर मात्र ते सुद्धा कोरोनापुढे हतबल बनले. आणि सरकारने त्याच गरजू मध्यमवर्गीय लोकांना रस्त्यावर येण्यास मजबूर केले. निम्मित बनले, "ढासळती अर्थव्यवस्था."

काही वेळेस लोकांनाही त्यांच्या गरजा भागवण्यासाठी नाईलाजाने घराबाहेर पडणे गरजेचे पडले. अश्या वेळेस त्या लोकांना कुठून न कुठून कोरोनाची लागण होणे साहजिकच आहे. त्यात त्या बिचाऱ्या गरजू लोकांचाही काय दोष. उलट त्यांनी देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला हातभारच लावला ना! मग अश्या वेळी नेमका दोष द्यायचा कोणाला? काम नसतांनाही बेवारस हिंडणाऱ्या लोकांना की महामारीवर नियंत्रण न मिळवू शकलेल्या हतबल सरकारांना.!! *(केंद्र सरकार की राज्य सरकार.?!!) इतर वेळी यशाचे श्रेय घेण्यास हापापलेेल्या सरकारांनी यावेळेस मात्र पध्द्तशीरपणे चार हात लांबच राहणे पसंद केलेले दिसते. आत्मनिर्भरतेच्या पडद्याखाली गेली चार एक महिने नुसतं चायना चायना आणि चायनीजच पहायला मिळते आहे. अश्यावेळी मला आश्रम वेब सिरीज मधील एक लाईन आठवतेय, "लोगों को पैसा देने के लिये तैयार हैं आप, लेकींन उनके भले के लिये पैसा खर्च करना नहीं चाहते आप.. ." जपनाम जपनाम.. .,

कोरोना किंवा कोविड19 नेमका कुठून आला यावर आजही तितकेच प्रश्नचिन्ह आहेत. शंका कुशंका आहेत. शोध प्रतिशोध आहेत. जाता जाता मला या अनुभवातुन काहीतरी शिकायचे आहे, या खचलेल्या परिस्थितीतुन बाहेर पडायचे आहे. ज्या गोष्टींमुळे मी इतका मूर्खात निघालोय, त्या चुका मला पुन्हा पुन्हा करायच्या नाहीयेत. एकंदरीत मी किंवा माझा देश मूर्ख न बनता, या महामारीला कोरोनाला मूर्ख बनवायचे आहे.

Thank you.

[मी काही कोरोनातज्ञ किंवा साथरोगतज्ञ किंवा WHO चा विश्लेषक नाहीये. गेले सहा एक महिन्यांमध्ये जे ऐकलं, पाहिलं, वाचलं, अनुभवलं यांवरूनच मांडलेलं सदरचे निरीक्षण आहे. त्यामुळे कोणी कमेंटमध्ये येऊन माझी अक्कल वगैरे काढण्याचा प्रयत्न करू नये. प्लीज.]



_whosunilmali

Comments

Popular posts from this blog

ओय हमाली.!!

Once upon a time in बुधवार पेठ,

"काळू"